Bedwetting

By Vaidya Harish Patankar  
260     119   0



 १. आजकाल लहान मूलं फार उशिरापर्यंत जागे राहतात, उशिरा उठतात यांना काय उपाय करावा? याने त्यांच्या आरोग्याला काही त्रास होतो का?

उत्तर- लहान मुलांनी खरंतर रात्री जागरण बिलकुल करु नये. याचा फार विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. रात्री कोणत्याही कारणाने त्यांनी जागरण केल्यास त्यांची पचनशक्ती बिघडते, वात व पित्त दोष वाढू लागतो, शरीराचे पोषण होत नाही मग मुलं चिडचिड करू लागतात. सकाळी उशिरापर्यंत झोपून राहतात. मग त्यांना पुन्हा दिवसभर आळस भरल्यासारखे होते, व्यायाम होत नाही, सकाळचे कोवळे उन्ह मिळत नाही त्यामुळे हाडांना बळकटी मिळत नाही. हाडे लवकर ठिसूळ होतात, ड जीवनसत्व कमी मिळाल्याने शरीराची वाढ कमी होते. बुद्धी, स्मृति, एकाग्रता सुद्धा कमी होते. अभ्यासात लक्ष लागत नाही. म्हणून लहान मुलांना नेहमी लवकर झोपवावे व सकाळी लवकर उठवावे. सकाळी उठून त्यांना मंत्रपठण, योगासन, प्राणायाम, व्यायाम, सूर्यनमस्कार, उन्हात बसने अश्या सवयी लावाव्यात. याने मुलांचे आरोग्य सुधारते.


2. लहान मुले झोपेत शु करत असल्यास काय उपाय करावा? याचे कारण काय असते?

उत्तर- लहान मुले ही लहान, न कळती असतात, त्यामुळे सर्व इंद्रियांवर त्यांचे अजून पूर्ण नियंत्रण आलेले नसते. त्यातच मूत्राशय रात्री पूर्ण भरला की त्यांना आपण शु करत आहोत असे स्वप्न पडते आणि ते मूत्र विसर्जन करतात. चादर ओली झाली की त्यांना जाग येते आणि मग ते रडू लागतात. असेच साधारण वयात आलेल्या मुलांच्या बाबतीत पण होतं. यामुळे मुलांना पूर्वी च्या काळी करगोटा व सुपारी कंबरेला बांधायचे. यामुळे रात्री हालचाल झाली, करगोटा रुतला की मुलांना जाग येत असे व झोपेतील स्वप्न भंग झाल्याने शु करण्याचे प्रमाण कमी होत असे. शिवाय काही विशिष्ट मज्जा तंतूंवर याचा दाब पडत असल्याने ऍक्युप्रेशर थेरपी होऊन आपोआप रात्री अपरात्री शु चे प्रमाण कमी होत असे. तसेच इतर उपयांमध्ये मुलांना झोपताना दोन तास आदीच खाणंपिणे संपविणे, झोपण्यापूर्वी शु ला जाऊन यायला सांगणे. रात्री शु लागल्यावर झोपेतून उठून बाहेर जायला त्यांना शिक्षण देणे अश्या प्रकारे आपण त्यांची ही सवय बंद करू शकतो. त्याचप्रमाणे आयुर्वेदात काही गोळ्या व औषधे सुद्धा यावर फार उत्तम व गुणकारी आढळून आलेली आहेत, ती सुद्धा वापरून आपण हे नियंत्रणात आणू शकतो. 


3. लहान मुलांच्या आहारासाठी त्यांच्या मागे फार लागावं लागत, लवकर जेवण करत नाहीत, काय करावे?

उत्तर- लहान मुलांना संवेदना बऱ्याचदा सांगता वा व्यक्त करता येत नाही. अगदीच लहान असताना ते भूक लागली तरी रडतात, काही त्रास झाला तरी रडतात किंवा काहीही छोटं कारण घडलं तरी सहज हसतात. त्यावेळी आपण नियमित ठरलेल्या वेळी त्यांचा आहार देत असतो. मग ती थोडी मोठी झाली की आपल्याला वाटत त्यांनी आपल्याला भूक लागली आहे म्हणून सांगावं पण तसं लगेच होत नाही, त्यांची चिडचिड वाढत जाते. आपण समजून घ्यावे. शिवाय वरवरचे सतत फास्ट फूड, अनियमित वेळा, काही ना काही सतत थोडं थोडं चॉकलेट वेफर्स आदी खाणे यामुळे त्यांची भूक मंदावते व पर्यायी मुलं कमी जेवण करतात. त्यांना नियमित वेळेवर सकाळी भरपूर नाष्टा, दोन तीन वेळा मुबलक जेवण द्यावे, आधी मध्ये काही खायला देऊ नये व फास्ट फूड टाळावे म्हणजे त्यांची पचनशक्ती सुधारते व मुलांचे वजन पण उत्तम राहते, सर्वात महत्वाचे सुदृढ राहतात. नाहीतर आहार बिघडला की मुलांचे आरोग्य सुद्धा हळुहळु बिघडू लागते.



Share on

Like Now
Total Likes
119
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments