Ginger - Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
508     123   0



1. चहात आलं टाकुन चहा पिणे चांगलं आहे का?

उत्तर- आलं हे उत्तम पाचक, अग्निदीपक व अग्निवर्धक आहे. चहा मध्ये आलं टाकल्यास चहा मस्त लागतो, आल्यातील गुणधर्मामुळे तो अजून उष्ण बनतो. चहा ला एक प्रकारची झिंग या आल्याने बसते, म्हणून अनेकांना आलं टाकलेला चहा आवडतो. अल्प प्रमाणात हे ठीक आहे मात्र जास्त प्रमाणात झाल्यास याने पित्त वाढते. अनेक जण सुंठ टाकून चहा करतात, तो चहा अजून जास्त पित्तकारक व ग्राही बनतो. या चहाने पोटात जळजळ होते व पोट साफ होत नाही. जेवणापूर्वी मीठ लावून आल्याचा तुकडा खाल्ल्यास भूक चांगली लागते व तोंडाला रुची येते. अन्नाचे पचन चांगले होते व कफ आणि वायूचा नाश होतो.


2. आलं आणि मध एकत्र घेतल्यास दम कमी होतो का?

उत्तर- आल्याच्या रसात मध घालून प्यायल्याने सर्दी, खोकला व दम लागणे कमी होते. यातच थोडा लिंबाचा रस व पिंपळी घालून दिवसातून दोन तीन वेळा चाटण घेतल्यास खोकला बरा होतो. आलं आणि पुदिना एकत्र करून काढा करून प्यायल्याने दरदरून घाम फुटून ताप उतरतो. आल्याचा रस व कांद्याचा रस एक एक तोळा घेऊन प्यायला दिल्यास उलटी बंद होते. आपल्या घरगुती मसाल्याच्या डब्ब्यातच अशी अनेक औषधी दडलेली आहेत. प्रथोमोपचार हा खरा आज्जीबाई च्या बटव्यात आणि मसाल्याच्या डब्ब्यातच आहे. आपले आरोग्य आपल्या हाती आहे, फक्त आपण त्यांचे थोडे गुणधर्म तरी जाणून शिकून घेतले पाहिजेत. हृद्रोगमध्ये सुद्धा आल्याचा रस आणि पाणी समप्रमाणात प्यायला देतात, तर मूत्रविकारात आल्याचा रस खाडीसाखरेसह चाटण करावा. आल्याचा रस नाभीवर लावल्यास भूक वाढते आणि जुलाब सुद्धा थांबतात. असे हे बहुगुणी आलं गुरु, तीक्ष्ण, उष्ण, तिखट, पाकात मधुर, रुक्ष, वायू व कफहारक, हृद्रोग व आमवातावर आरोग्यदायक आहे. 


3. आलेपाक कसा करावा? त्याचा काय फायदा होतो?

उत्तर- ताज्या आल्याचा रस काढून त्यात थोडे पाणी व साखर घालून त्याचा पाक बनवावा. पाक तयार झाला की पातेले खाली उतरवून त्यात चवीसाठी केशर, वेलची, जायफळ, जायपत्री व लवंग घालून तो चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीत भरून ठेवावा. आपल्याला प्रकृती व पचनशक्ती नुसार हा पाक रोज सेवन केल्यास भूक चांगली वाढते, अग्निदीपन होते, कफाचा नाश होतो, सर्दी खोकला होत नाही, शरीरात रक्त शुद्धी होते , पोट साफ होण्यास मदत होते. हिवाळ्याच्या दिवसात रसायन म्हणून भूक वाढीसाठी व शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी अजूनही अनेक ठिकाणी आलेपाक घराघरात खातात.



Share on

Like Now
Total Likes
123
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments